सौ. ममता पाटील यांच्या पुढाकारातून महिलांचा स्नेहमेळावा; सप्ताह यशस्वी करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्याचा निर्धार
पाळधी : धरणगाव तालुक्यात दरवर्षी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या भव्य हरिनाम सप्ताह आणि कीर्तन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर ‘जीपीएस महिला मंडळा’ची स्थापना करण्यात आली. जिप सदस्य प्रतापराव पाटील यांच्या सौभाग्यवती सौ. ममता पाटील यांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबविण्यात आला.
दरवर्षी जीपीएस मित्र परिवाराच्या माध्यमातून महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांना निमंत्रित करून भव्य हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले जाते. या धार्मिक सोहळ्यासाठी केवळ जिल्ह्यातूनच नव्हे तर राज्यभरातून हजारो भाविक कीर्तन श्रवणासाठी उपस्थित राहत असतात. सप्ताह यशस्वी करण्यासाठी कार्यकर्ते दिवसरात्र परिश्रम घेत असतात.
याच कार्यातून प्रेरणा घेत सौ. ममता पाटील यांनी जीपीएस मित्र परिवारातील महिला सदस्यांची बैठक आयोजित केली. यावेळी महिलांना सप्ताहाच्या नियोजनाची माहिती देण्यात आली. उपस्थित सर्व महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत सप्ताहासाठी सर्वतोपरी योगदान देण्याचा निर्धार व्यक्त केला.
यानिमित्त आयोजित स्नेहमेळाव्यात महिलांमध्ये हितगुज करण्यात आले तसेच ‘जीपीएस महिला मंडळा’ची अधिकृत स्थापना करण्यात आली. विशेष म्हणजे, या मंडळात कोणतीही पदाधिकारी किंवा कार्यकारिणी न ठेवता सर्व सदस्यांनी समान सहभागातून कार्य करावे, अशी अनोखी संकल्पना मांडण्यात आली. या वेगळ्या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
यावेळी प्रतापराव पाटील यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन करत वर्षभर विविध सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती दिली. हरिनाम सप्ताह अधिक भव्य आणि यशस्वी करण्यासाठी महिलांचा सहभाग महत्त्वाचा ठरणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
