स्थानिक गुन्हे शाखा व धरणगाव पोलिसांची संयुक्त कारवाई; ९० हजारांचा मुद्देमाल जप्त, एक विधीसंघर्षग्रस्त बालक ताब्यात
धरणगाव, प्रतिनिधी । प्रशांत शिंदे ।
धरणगाव शहरातील मातोश्री कॉम्प्लेक्स परिसरात घडलेल्या गंभीर गुन्ह्याचा अवघ्या काही दिवसांत छडा लावत धरणगाव पोलीस आणि जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पथकाने मोठे यश संपादन केले आहे. या प्रकरणातील मुख्य सूत्रधारासह तीन आरोपींना अटक करण्यात आली असून एका १७ वर्षीय विधीसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपींकडून गुन्ह्यात वापरण्यात आलेली दुचाकी आणि ९० हजार रुपयांची रोकड जप्त करण्यात आली असून न्यायालयाने आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
मातोश्री कॉम्प्लेक्स परिसरातील घटनेने उडाली होती खळबळ
वाणी गल्ली येथील रहिवासी व किराणा व्यावसायिक भगवान आत्माराम माळी (वय ७२) यांनी याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. ४ जून २०२६ रोजी रात्री साडेदहा ते अकराच्या सुमारास मातोश्री कॉम्प्लेक्स परिसरात हा गुन्हा घडला होता. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३०४(२), ३०९ व ३(५) अन्वये गुन्हा क्रमांक २१८/२०२६ दाखल करण्यात आला होता.
गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांचा सापळा
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन धरणगाव पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेने तपासाची चक्रे वेगाने फिरवली. गोपनीय माहितीच्या आधारे कंडारी रोडवरील युक्ता हॉटेलच्या मागील मोकळ्या जागेत संशयित आरोपी थांबून असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पोलिसांनी तात्काळ सापळा रचून प्रमोद प्रकाश पारधी (वय २०, रा. रामपुरा, ता. चोपडा), राहुल अनंत सोनवणे (वय २२, रा. दहिवद, ता. अमळनेर) आणि एका विधीसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेतले.
त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरण्यात आलेली लाल-काळ्या रंगाची हिरो कंपनीची मोटारसायकल (एमएच-१९-डीजे-६५५३) जप्त करण्यात आली.
धरणगावातील तरुणच निघाला कटाचा सूत्रधार
पोलिसी चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर या संपूर्ण कटाचा सूत्रधार सूरज उर्फ मुन्ना अनिल पचरेवार (वय ३०, रा. रामदेवजी बाबा नगर, धरणगाव) असल्याचे समोर आले. तक्रारदाराचा मुलगा चेतन भगवान महाजन याच्याशी १० ते १२ दिवसांपूर्वी झालेल्या वादातून त्याने हा कट रचल्याचे तपासात निष्पन्न झाले.
वादानंतर चेतन महाजन याला “तुला बघून घेतो” अशी धमकी देण्यात आली होती. त्यानंतर चोपडा व अमळनेर येथील आरोपींना सोबत घेऊन हा गुन्हा घडवून आणल्याचे उघड झाले. पोलिसांनी तातडीने कारवाई करत मुख्य सूत्रधार सूरज पचरेवार यालाही अटक केली.
आरोपींकडून ९० हजारांची रोकड जप्त
आरोपींच्या अंगझडतीदरम्यान विधीसंघर्षग्रस्त बालकाकडून १० हजार रुपये, प्रमोद पारधीकडून ५० हजार रुपये आणि राहुल सोनवणेकडून ३० हजार रुपये अशी एकूण ९० हजार रुपयांची रोकड हस्तगत करण्यात आली. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर विधीसंघर्षग्रस्त बालकाला त्याच्या आईच्या ताब्यात देण्यात आले.
उर्वरित रक्कम आणि इतर गुन्ह्यांचा तपास सुरू
उर्वरित मुद्देमाल हस्तगत करणे तसेच आरोपींनी यापूर्वी अशाच प्रकारचे गुन्हे केले आहेत का, याचा तपास सुरू आहे. पोलीस उपनिरीक्षक संतोष काशिनाथ पवार यांनी आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
प्राथमिक चौकशीत या गुन्ह्याची व्याप्ती आणखी मोठी असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असून आरोपींकडून आणखी रोकड आणि महत्त्वाची माहिती मिळण्याची अपेक्षा पोलिसांनी व्यक्त केली आहे.
पोलिसांच्या पथकाची उल्लेखनीय कामगिरी
ही कारवाई पोलीस निरीक्षक सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शेखर डोमाळे, संतोष पवार, विष्णू बिराडे, दीपक माळी, रावसाहेब पाटील, चंदन पाटील, सुमित बाविस्कर, महेंद्र बागुल, मिलिंद भामरे आणि किशोर भोई यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.
