दिना नगर, नेब कॉलनी व सुहास नगर परिसरातील घटना; प्रभावी उपाययोजनांची नागरिकांची मागणी
संघरत्न सपकाळे भुसावळ | प्रतिनिधी
भुसावळ शहरातील प्रभाग क्रमांक २४ मध्ये भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव नागरिकांसाठी चिंतेचा विषय ठरत आहे. परिसरात भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्याच्या सलग घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, देना नगर परिसरात एका तरुणास आणि एका वयोवृद्ध व्यक्तीस भटक्या कुत्र्याने चावा घेतला. त्यानंतर नेब कॉलनीमध्ये एका लहान मुलाच्या कानाला कुत्र्याने चावा घेतल्याची घटना घडली. तसेच सुहास नगर परिसरात एका वयोवृद्ध व्यक्तीच्या पोटाला चावा घेतल्याची माहितीही समोर आली आहे.
स्थानिकांच्या दाव्यानुसार, एकाच कुत्र्याने चार नागरिकांवर हल्ला केला असून एका दुसऱ्या कुत्र्यावरही हल्ला केल्याची घटना घडली. त्यामुळे परिसरात घबराट पसरली. नागरिकांनी लाठ्या-काठ्या घेऊन संबंधित कुत्र्याचा शोध घेतला. नागरिकांच्या म्हणण्यानुसार, संबंधित कुत्रा पिसाळलेला असल्याचा संशय असल्याने पुढील अनर्थ टाळण्यासाठी त्याला ठार मारण्यात आले.

या घटनेनंतर नागरिकांनी भुसावळ नगरपालिका प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली आहे. भटक्या कुत्र्यांना पकडण्याची मोहीम प्रभावीपणे राबवली जात नसल्याचा आरोप करत, केवळ काही भागांपुरती कारवाई करून इतर गल्लीबोळांकडे दुर्लक्ष होत असल्याची टीका नागरिकांनी केली.
प्रभाग क्रमांक २४ सह शहरातील इतर भागांमध्येही भटक्या कुत्र्यांना पकडण्यासाठी व्यापक मोहीम राबवावी, नागरिकांच्या सुरक्षेसाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात आणि अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
