तलवार, टॉमी, मिरचीपूड, दोरखंड, बनावट नोटा व इको कार जप्त; रावेर पोलिसांची धाडसी कारवाई
रावेर | प्रतिनिधी
रावेर शहरात दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या संशयित टोळीचा रावेर पोलिसांनी धाडसी पाठलाग करून कट उधळून लावला. या कारवाईत दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याकडून तलवार, टॉमी, मिरचीपूड, दोरखंड, बनावट नोटा आणि एक इको कार असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तर त्यांच्या तिघा साथीदारांनी अंधाराचा आणि शेतशिवाराचा फायदा घेत पसार होण्यात यश मिळवले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ९ जुलै रोजी पाल दुर्गक्षेत्र येथे कर्तव्यावर असलेले पोलीस हेड कॉन्स्टेबल ईश्वर चव्हाण यांना पाल गावातून एक संशयास्पद इको कार रावेरच्या दिशेने भरधाव वेगाने जात असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी गुन्हे शोध पथकाला तातडीने रवाना करून दोन्ही बाजूंनी नाकाबंदीचे नियोजन केले.
आभोडा गावाजवळ पोलिसांनी संशयित वाहन अडविण्याचा प्रयत्न केला असता चालकाने वेगाने पळ काढला. रावेर शहरातील आठवडे बाजार परिसरातून बऱ्हाणपूर रस्त्यावरील शेताकडे जाताना वाहन चिखलात अडकल्याने संशयितांचा पळून जाण्याचा प्रयत्न फसला. यावेळी पोलिसांसह स्थानिक नागरिकांनीही पाठलाग केला. त्यापैकी तिघेजण शेतातून पसार झाले, तर दोघांना नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. दोघांनाही उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.
वाहनाची झडती घेतली असता त्यातून लोखंडी तलवार, टॉमी, पेंचिस, लाल मिरचीपूड, दोरखंड, सुमारे तीन लाख रुपये दर्शनी मूल्याच्या ‘चिल्ड्रन्स बँक’च्या बनावट नोटा तसेच एमएच-१९-ईए-२४०३ क्रमांकाची मारुती सुझुकी इको कार जप्त करण्यात आली.
या प्रकरणात निखिल प्रविण पाटील (वय २०) आणि अल्ताफ जलाल शेख (वय २६, दोघे रा. साईनगर, घोडबंदर रोड, कासार वडवली, जि. ठाणे) यांना ताब्यात घेण्यात आले आहे. मेहरबान जहांगीर तडवी (रा. पाल) याच्यासह अन्य दोन संशयितांचा शोध सुरू आहे.
या प्रकरणी रावेर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमे तसेच शस्त्र अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयितांचा इतर गुन्ह्यांशी संबंध आहे का आणि ते नेमका कोणता गंभीर गुन्हा करण्याच्या तयारीत होते, याचा सखोल तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप पाटील, पोलीस उपनिरीक्षक मनोज महाजन, तुषार पाटील तसेच रावेर गुन्हे शोध पथकाने केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक तुषार पाटील करीत आहेत.
