एलसीबी व जिल्हापेठ पोलिसांची संयुक्त धडक; दोन आरोपी जेरबंद, एक फरार • ३.०६ लाखांचा मुद्देमाल जप्त
जळगाव | प्रतिनिधी
जळगाव शहरात अंमली पदार्थांच्या अवैध विक्री व तस्करीविरोधात स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी) आणि जिल्हापेठ पोलिसांनी संयुक्तपणे मोठी कारवाई करत ५६.२९ ग्रॅम मेफेड्रोन (एमडी) जप्त केले. या कारवाईत दोन आरोपींना अटक करण्यात आली असून, एक आरोपी पसार झाला आहे. पोलिसांनी ३ लाख ६ हजार ५४० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
‘नशामुक्त भारत‘ अभियानांतर्गत जिल्ह्यात अंमली पदार्थांविरोधात विशेष मोहीम राबविण्याचे निर्देश पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिले आहेत. त्यानुसार १० जुलै रोजी पहाटे स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांना गुप्त माहिती मिळाली की, छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यामागील शासकीय तांत्रिक विद्यालयाशेजारील जी.एस. ग्राऊंड परिसरात काही व्यक्ती मेफेड्रोन विक्रीसाठी येणार आहेत.
या माहितीच्या आधारे एलसीबी आणि जिल्हापेठ पोलिसांनी संयुक्तपणे सापळा रचला. काही वेळात मोटारसायकलवरून आलेल्या तिघांना पोलिसांनी अडविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यापैकी एक जण अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून पसार झाला. उर्वरित दोघांना ताब्यात घेऊन तपासणी केली असता त्यांच्या ताब्यातून ५६.२९ ग्रॅम मेफेड्रोन आढळून आले.
कारवाईदरम्यान पोलिसांनी २ लाख ८१ हजार ५४० रुपये किमतीचे मेफेड्रोन तसेच २५ हजार रुपये किमतीची हिरो स्प्लेंडर (एमएच-१९-डीजे-०१३२) मोटारसायकल जप्त केली. अशाप्रकारे एकूण ३ लाख ६ हजार ५४० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
या प्रकरणी जयेश देविदास तायडे (वय २७, रा. हरीओम नगर, मोहन टॉकीजजवळ, जळगाव) आणि हितेंद्र शिवाजी परदेशी (वय ३१, रा. कांचन नगर, जळगाव) यांना अटक करण्यात आली आहे. प्राथमिक चौकशीत दोघांनीही फरार आरोपी भैय्या सोनवणे (रा. कांचन नगर, जळगाव) याच्याकडून विक्रीसाठी मेफेड्रोन घेतल्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली. फरार आरोपीचा शोध सुरू आहे.
दरम्यान, अटक करण्यात आलेल्या जयेश तायडे याच्याविरुद्ध यापूर्वी रामानंदनगर, जिल्हापेठ आणि जळगाव शहर पोलीस ठाण्यांमध्ये खुनाचा प्रयत्न, सरकारी कर्मचाऱ्याला कामात अडथळा, गंभीर दुखापत आणि दरोडा यांसारखे गंभीर गुन्हे दाखल असल्याचे तपासात समोर आले आहे.
या प्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ०२१७/२०२६ अन्वये एनडीपीएस कायदा, १९८५ मधील कलम ८(क), २२(क) व २९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, परिसरात अंमली पदार्थांची विक्री, साठवणूक किंवा वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्याशी किंवा स्थानिक गुन्हे शाखेशी संपर्क साधावा. माहिती देणाऱ्याचे नाव पूर्णपणे गोपनीय ठेवण्यात येईल.
ही उल्लेखनीय कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वात करण्यात आली. कारवाईत सहायक पोलीस निरीक्षक अनिल वाघ, पोलीस उपनिरीक्षक संतोष पवार, दीपक जगदाळे, जितेंद्र वल्टे, सहायक फौजदार अतुल वंजारी, हेमराज भावसार तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.
