तरुण, महिला, बचत गट व व्यावसायिकांसाठी हरित उद्योगात व्यवसायाची सुवर्णसंधी; प्रशिक्षण व मार्गदर्शनासह विविध योजनांचा लाभ
जळगाव | प्रतिनिधी
महाराष्ट्रात कचरा व्यवस्थापन हे केवळ स्वच्छतेपुरते मर्यादित न राहता वेगाने विकसित होत असलेले हरित उद्योग (ग्रीन बिझनेस) क्षेत्र बनले आहे. वाढते शहरीकरण, पर्यावरण संरक्षणाचे नियम आणि पुनर्वापर (रिसायकलिंग) यामुळे या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर रोजगार व उद्योजकतेच्या संधी निर्माण होत आहेत. या पार्श्वभूमीवर ‘अमृत’ (AMRUT) आणि कुशाग्र इनोव्हेशन्स फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यभर ‘अमृत-सक्षम’ हा विशेष उद्योजकता विकास उपक्रम राबविण्यात येत आहे.
या उपक्रमाच्या माध्यमातून सुकलेल्या फुलांपासून अगरबत्ती व धूपनिर्मिती, प्लास्टिक, कागद व काच पुनर्प्रक्रिया (रिसायकलिंग), तसेच रिसोर्स रिकव्हरी सेंटर (RRR) उभारणीसारख्या व्यवसायांसाठी मार्गदर्शन, तांत्रिक प्रशिक्षण आणि बाजारपेठेची जोड उपलब्ध करून दिली जाणार आहे. यामुळे रोजच्या कचऱ्यातून शाश्वत व्यवसाय उभा करून नियमित उत्पन्न मिळविण्याची संधी उपलब्ध होणार आहे.
या क्षेत्रात काम करण्यासाठी कोणत्याही पूर्वानुभवाची आवश्यकता नसून, स्वतःचा व्यवसाय सुरू करू इच्छिणारे युवक-युवती, महिला बचत गट, विद्यमान उद्योजक, निवृत्त अधिकारी-कर्मचारी, सामाजिक संस्था तसेच पर्यावरणप्रेमी नागरिक या उपक्रमात सहभागी होऊ शकतात. पात्र उमेदवारांना अमृत संस्थेमार्फत विविध योजनांचा लाभही दिला जाणार आहे.
इच्छुकांनी अमृत-सक्षमच्या ऑनलाइन नोंदणीद्वारे अर्ज करावा. अर्जाची पडताळणी झाल्यानंतर संबंधित उमेदवारांशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून जिल्हानिहाय कार्यशाळेची तारीख, वेळ आणि पुढील प्रक्रियेची माहिती दिली जाईल.
याशिवाय, या क्षेत्रातील व्यवसायाच्या संधींबाबत प्राथमिक माहिती देण्यासाठी १६ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजता AMRUTच्या युट्यूब चॅनेलवर थेट (लाईव्ह) मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी ७७५७०९१८५९ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
