रोख रक्कम, सोन्याचे दागिने व चांदीच्या वस्तूंवर चोरट्याचा डल्ला; अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल
पाचोरा | प्रतिनिधी
पाचोरा शहरातील गोविंद नगरी परिसरात बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने सुमारे ७५ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.
फिर्यादी भगवान रामचंद्र पाटील (वय ५५, व्यवसाय – शेती, रा. आसारामबापू आश्रम गार्डनजवळ, गोविंद नगरी, पाचोरा) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, १० जुलै २०२६ रोजी सकाळी १० वाजेपासून १२ जुलै २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजेदरम्यान त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्याने घरात प्रवेश केला.
चोरीमध्ये ४२ हजार रुपये रोख, सुमारे ३० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने (अंगठी व मंगळसूत्र) तसेच ३ हजार रुपयांच्या चांदीच्या देवाच्या पत्र्या असा एकूण ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास करण्यात आला.
या प्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३३६/२०२६ दाखल करण्यात आला असून बीएनएस कलम ३०५(अ), ३३१(३) व ३३१(४) अंतर्गत अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
या गुन्ह्याचा पुढील तपास पाचोरा पोलीस करीत आहेत.
