लोणढ्री येथे कुऱ्हाडीने हल्ल्याचा आरोप; बीएनएस व ॲट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा, तपास सुरू
जामनेर | प्रतिनिधी
जामनेर तालुक्यातील लोणढ्री येथे जातीवाचक शिवीगाळ करून एका व्यक्तीवर जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी पहुर पोलीस ठाण्यात दोन जणांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) तसेच अनुसूचित जाती-जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी ममता गफार तडवी (वय ३५, रा. लोणढ्री, ता. जामनेर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा क्रमांक १७५/२०२६ नोंदविण्यात आला आहे. त्यानुसार बीएनएस कलम १०९(१), ३५२, ११५(२), ३(५) तसेच अनुसूचित जाती-जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्यातील कलम ३(१)(R), ३(१)(S) आणि ३(२)(V) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
फिर्यादीनुसार, ७ जुलै २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ४ वाजता नामदेव ठोंबरे यांच्या टपरीजवळ ही घटना घडली. फिर्यादीचे पती अनुसूचित जमातीतील असल्याची माहिती असतानाही संशयितांनी त्यांना जातीवाचक शिवीगाळ केली. त्यानंतर जीवे मारण्याच्या उद्देशाने कुऱ्हाड व लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. या वेळी फिर्यादी आणि त्यांच्या सासूलाही शिवीगाळ करण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी अमोल कृष्णा ठुबे आणि सूर्यभान रामचंद्र ठुबे, दोघेही रा. लोणढ्री, ता. जामनेर, यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वृत्त लिहिपर्यंत या प्रकरणात कोणालाही अटक झालेली नव्हती.
या गुन्ह्याचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकूरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
