नशिराबाद: नशिराबाद नगर परिषद हद्दीतील भवानी नगर परिसरात अत्यंत गरीब व गरजू नागरिक वास्तव्य करत आहेत. या भागातील अनेक घरे झोपडपट्टीसदृश अवस्थेत असून अनेक कुटुंबे कच्च्या व जीर्ण घरांमध्ये राहतात. पावसाळ्यात घरांमध्ये पाणी गळते, तर अनेकांना सुरक्षित निवाऱ्याचा अभाव आहे. या पार्श्वभूमीवर, जळगाव जिल्हा जनरल कामगार सेनेचे अध्यक्ष श्री. प्रदिप साळी यांनी अस्थापना प्रमुख गितांजली राऊत मॅडम यांना निवेदन दिले आहे.
प्रतिलिपी (प्रत): हे निवेदन खालील पदाधिकाऱ्यांना देखील देण्यात आले आहे:
* मा. जिल्हाधिकारी, जळगाव.
* मा. विभागीय आयुक्त, नाशिक विभाग.
* मा. प्रधान सचिव, गृहनिर्माण विभाग, महाराष्ट्र शासन, मंत्रालय, मुंबई.
* मा. मुख्यमंत्री सचिवालय, मंत्रालय, मुंबई.
समस्येचे स्वरूप: भवानी नगर परिसरातील बहुसंख्य नागरिकांकडे ७/१२ उतारा किंवा सिटी सर्वे उतारा नसून नमुना ८-अ उपलब्ध आहे, त्यामुळे त्यांना शासनाच्या घरकुल योजनेचा लाभ मिळण्यास अडचणी निर्माण होत आहेत. मागील पाच वर्षांपासून या परिसरातील एकाही पात्र गरीब कुटुंबाला घरकुल योजनेचा लाभ मिळालेला नाही.
*निवेदनातील प्रमुख मागण्या:*
* भवानी नगर परिसराचे तातडीने विशेष सर्वेक्षण करून सर्व पात्र व गरजू कुटुंबांची यादी तयार करावी.
* मागील पाच वर्षात घरकुल योजनेचा लाभ का मिळाला नाही, याची सखोल चौकशी करावी.
* नमुना ८-अ धारक नागरिकांना घरकुल योजनेचा लाभ मिळण्यासाठी शासनाकडून आवश्यक मार्गदर्शक सूचना मागवून त्यानुसार कार्यवाही करावी.
* पात्र लाभार्थ्याचे प्रस्ताव तातडीने मंजूर करून त्यांना घरकुल योजनेचा लाभ द्यावा.
* या प्रकरणाची प्रत्यक्ष पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांचा अहवाल सार्वजनिक करावा.
गरीब व गरजू नागरिकांना स्वतःच्या घराचा हक्क मिळण्यासाठी १५ दिवसांच्या आत ठोस कार्यवाही करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे. अन्यथा, भवानी नगरातील नागरिकांसह लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
