सोन्या-चांदीचे दागिने आणि रोकडवर चोरट्यांचा डल्ला; अमळनेर पोलिसांत गुन्हा दाखल
जळगाव | प्रतिनिधी
अमळनेर तालुक्यातील रामेश्वर येथे अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून घरफोडी करत सोन्या-चांदीचे दागिने आणि रोकड असा एकूण ६० हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १७ जून रोजी रात्री ९ ते १८ जून रोजी सकाळी ५ वाजेच्या दरम्यान ही घरफोडी झाली. चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. घरातील कपाटातून सोन्या-चांदीचे दागिने आणि रोकड चोरून नेण्यात आली.
चोरीस गेलेल्या ऐवजात २० हजार रुपये किमतीचे १० ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र, १० हजार रुपये किमतीची ५ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी, २ हजार रुपये किमतीची चांदीची चैन, २० हजार रुपये किमतीचे चांदीचे दागिने आणि ८ हजार रुपयांची रोकड असा एकूण ६० हजार रुपयांचा मुद्देमाल समाविष्ट आहे.
याप्रकरणी कस्तुराबाई साहेबराव वंजारी (वय ६५, रा. रामेश्वर, ता. अमळनेर) यांनी १५ जुलै रोजी अमळनेर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०५(अ), ३३१(३) आणि ३३१(४) अन्वये अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल राजेंद्र देशमाने करीत आहेत. परिसरातील घरफोड्यांच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून तपासाला वेग देण्यात आला आहे.
