अॅल्युमिनियम वायर व हार्डवेअर लंपास; मुक्ताईनगर पोलिसांत गुन्हा दाखल
जळगाव | प्रतिनिधी
मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी गावाच्या शिवारातून महावितरणच्या कामासाठी ठेवण्यात आलेले सुमारे ७० हजार रुपये किमतीचे अॅल्युमिनियम वायर आणि हार्डवेअर साहित्य अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १४ जुलै रोजी सायंकाळी ६ ते १५ जुलै रोजी सकाळी ९ वाजेच्या दरम्यान ही चोरी झाली. कोथळी गावाच्या शिवारात महावितरणच्या कामासाठी ठेवण्यात आलेले अॅल्युमिनियम वायर व इतर हार्डवेअर साहित्य चोरट्यांनी लंपास केले.
याप्रकरणी एमएसईबीचे कंत्राटदार सुपडू उखा पाटील (वय ४२, रा. पिंपळगाव बु., ता. भुसावळ) यांनी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली.
फिर्यादीच्या तक्रारीवरून भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२) अन्वये अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप वानखेडे करीत आहेत.
