अमळनेर-धरणगाव रस्त्यावर महसूल विभागाची कारवाई; चालकाविरुद्ध गुन्हा दाखल
अमळनेर | प्रतिनिधी
अमळनेर-धरणगाव रस्त्यावरील बी.एस. पाटील आश्रमशाळेमागील मोकळ्या जागेत अवैधरित्या मुरूम वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर-ट्रॉलीवर महसूल विभागाने कारवाई केली. या कारवाईत ट्रॅक्टर-ट्रॉलीसह एक ब्रास मुरूम असा एकूण २ लाख १२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १४ जुलै रोजी दुपारी अवैधरित्या मुरूम वाहतूक होत असल्याची माहिती महसूल विभागाला मिळाली होती. त्यानुसार पथकाने कारवाई करत मुरूम वाहतूक करणारा ट्रॅक्टर ताब्यात घेतला.
या कारवाईत सुमारे २ लाख रुपये किमतीचा स्वराज कंपनीचा ट्रॅक्टर (क्रमांक एमएच-२९-एके-२३३३), ट्रॉली (क्रमांक एमएच-१९-ईओ-२१४५) तसेच १२ हजार रुपये किमतीचा एक ब्रास मुरूम असा एकूण २ लाख १२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
याप्रकरणी हर्षल भाऊराव सुतार (वय २४, रा. भोईवाडा, अमळनेर) याच्याविरुद्ध अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जप्त केलेला ट्रॅक्टर पोलीस ठाण्यात जमा करण्यात आला असून पुढील तपास पोहेकॉ. गणेश पाटील करीत आहेत.
