नवनियुक्त विद्यार्थी प्रतिनिधींचा शपथविधी; नेतृत्वगुण, शिस्त आणि सामाजिक उत्तरदायित्वाचा दिला संदेश
जळगाव | प्रतिनिधी (सोमेश मुळे)
लेवा एज्युकेशनल युनियन संचालित सरस्वती प्रायमरी इंग्लिश मीडियम स्कूल, एम.आय.डी.सी., जळगाव येथे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी विद्यार्थी नेतृत्व मंडळाच्या (Student Council) पदग्रहण समारंभाचे आयोजन उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण, शिस्त आणि जबाबदारीची भावना विकसित व्हावी, या उद्देशाने हा सोहळा पार पडला.
कार्यक्रमाची सुरुवात सुश्राव्य स्वागतगीताने झाली. त्यानंतर लोकशाही पद्धतीने निवडून आलेल्या नवनियुक्त विद्यार्थी प्रतिनिधींना अधिकृत बॅज व स्कार्फ प्रदान करण्यात आले. सर्व पदाधिकाऱ्यांनी शाळेच्या नियमांचे पालन, कर्तव्यनिष्ठा आणि शिस्त राखण्याची सामूहिक शपथ घेतली.
यावेळी लेवा एज्युकेशनल युनियनचे अध्यक्ष प्रज्ञावंत नंदकुमार गोपाळराव बेंडाळे यांनी नवनियुक्त प्रतिनिधींचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या. “पद हे केवळ अधिकाराचे नसून जबाबदारीचे प्रतीक आहे. विद्यार्थ्यांनी नेतृत्वगुण, आत्मविश्वास आणि सामाजिक उत्तरदायित्व जोपासून शाळेचे नाव उज्ज्वल करावे,” असे मार्गदर्शन त्यांनी केले.
या कार्यक्रमासाठी शाळेचे प्राचार्य डेविड दास यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाला शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
