पाचव्या आंतरराष्ट्रीय बहुभाषिक साहित्य संमेलनात प्रकाशन; डॉ. रविंद्र शोभणे यांच्या हस्ते सन्मान
गणेश रावळ वडगाव तालुका प्रतिनिधी
भडगाव तालुक्यातील मूळ रहिवासी असलेले १२ वर्षीय बालकवी प्रणव येळमकर यांच्या ‘सुबोध बालकाव्य गीत’ या काव्यसंग्रहाचे नागपूर येथे नुकत्याच पार पडलेल्या पाचव्या आंतरराष्ट्रीय बहुभाषिक साहित्य संमेलनात प्रकाशन करण्यात आले. यावेळी त्यांचा सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.
हा काव्यसंग्रह डॉ. सागर गुडमेवार यांच्या के. ए. समूह इंटरनॅशनल पब्लिकेशन, पुणे यांच्या वतीने प्रकाशित करण्यात आला. संमेलनात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. रविंद्र शोभणे यांच्या हस्ते प्रणव येळमकर यांचा सत्कार करण्यात आला. विविध राज्ये आणि देशांतून सहभागी झालेल्या साहित्यिकांनी त्यांच्या प्रतिभेचे विशेष कौतुक केले.
प्रणव येळमकर हे श्री दत्त मंदिर, भातखंडे बुद्रूक (ता. भडगाव, जि. जळगाव) येथील मूळ रहिवासी असून सध्या अध्यात्मिक व शालेय शिक्षणासाठी एरंडोल तालुक्यातील जवखेडा सिम येथील साधनानंद महानुभाव आश्रमात वास्तव्यास आहेत. तेथे श्रीमद् भगवद्गीता व ब्रह्मविद्येचे शिक्षण घेत असताना त्यांच्यातील काव्यप्रतिभेला वाव मिळाला.
गुरुवर्य प.पू. महात्मा श्री. भूषणमुनी बाबा अंकुळनेरकर यांनी त्यांच्या काव्यगुणांची दखल घेत त्यांना मार्गदर्शन व प्रेरणा दिली. त्यांच्या प्रेरणेतून १०२ कवितांचा ‘सुबोध बालकाव्य गीत’ हा संग्रह साकार झाला.
काव्यसंग्रह प्रकाशित झाल्यानंतर जवखेडा सिम येथील आश्रम तसेच भातखंडे येथे प्रणव येळमकर यांचा सत्कार करण्यात आला. पुस्तकाला शाळकरी विद्यार्थी, पालक आणि साहित्यप्रेमी यांच्याकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून त्याची मागणी दिवसेंदिवस वाढत असल्याचे सांगण्यात आले.
