पाळधी रेल्वे स्थानकावर सुरत–पंढरपूर एक्सप्रेसमधील वारकऱ्यांचे स्वागत; प्रत्येक डब्यात जाऊन फराळाचे वितरण, रेल्वे थांब्यासाठीच्या पाठपुराव्यालाही यश
पाळधी | प्रतिनिधी
आषाढी वारीनिमित्त पंढरपूरकडे निघालेल्या वारकरी भक्तांच्या सेवेसाठी जीपीएस मित्र परिवाराने पाळधी रेल्वे स्थानकावर स्तुत्य उपक्रम राबविला. सुरत–पंढरपूर एक्सप्रेस स्थानकावर थांबताच कार्यकर्त्यांनी प्रत्येक डब्यात जाऊन वारकरी भाविकांना फराळाचे वाटप केले. सेवाभावातून राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे वारकऱ्यांनी मनापासून स्वागत केले.
पाळधी रेल्वे स्थानकावर सुरत–पंढरपूर एक्सप्रेसला थांबा मिळावा यासाठी जीपीएस मित्र परिवाराने काही दिवसांपूर्वी रेल्वे प्रशासनाकडे निवेदन दिले होते. स्थानिक प्रवासी व वारकऱ्यांच्या सोयीसाठी करण्यात आलेल्या या पाठपुराव्याला यश मिळाल्याने परिसरात समाधानाचे वातावरण आहे.
यावेळी युवा नेते तथा माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांनी भविष्यात खानदेश एक्सप्रेस तसेच सुरत–भुसावळ रात्रीची पॅसेंजरलाही पाळधी येथे नियमित थांबा देण्याची मागणी केली. या दोन्ही गाड्यांचा थांबा परिसरातील हजारो प्रवाशांसाठी महत्त्वाचा असल्याचे त्यांनी सांगितले.
दुपारी सुमारे एकच्या सुमारास रेल्वे स्थानकावर एक्सप्रेस दाखल होताच कार्यकर्त्यांनी नियोजनबद्ध पद्धतीने प्रत्येक डब्यात जाऊन कोणताही वारकरी फराळापासून वंचित राहणार नाही, याची विशेष काळजी घेतली.
प्रतापराव पाटील यांनी स्वतः प्रत्येक डब्यात जाऊन वारकरी भाविकांची भेट घेत त्यांच्या प्रवासाची विचारपूस केली आणि सुखरूप वारीच्या शुभेच्छा दिल्या. वारी ही सेवा, समर्पण आणि सामाजिक ऐक्याचा संदेश देणारी परंपरा असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
या उपक्रमात जीपीएस मित्र परिवाराचे ज्येष्ठ सदस्य हेमंत नारखेडे (बंडूकाका) यांचा उत्साह विशेष लक्षवेधी ठरला. वयाच्या ६५व्या वर्षीही त्यांनी फराळ वितरण, डब्यांचे नियोजन आणि संपूर्ण उपक्रमाचे समन्वयन करत कार्यकर्त्यांना प्रेरणा दिली.
वारकरी भाविकांनी या सेवाभावी उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त करत जीपीएस मित्र परिवाराच्या कार्यकर्त्यांचे आभार मानले. आरोग्य, शिक्षण, रक्तदान, नेत्रतपासणी आणि जनजागृतीसारखे विविध समाजोपयोगी उपक्रम सातत्याने राबविणाऱ्या जीपीएस मित्र परिवाराने वारीतील फराळ वाटपातून सामाजिक बांधिलकीची आणखी एक प्रेरणादायी परंपरा कायम ठेवली.
