अडावद येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिराला’ उत्स्फूर्त प्रतिसाद
२ हजारांहून अधिक लाभार्थ्यांनी घेतला विविध योजनांचा लाभ; घरकुल, रेशन व निराधार योजनांबाबतच्या तक्रारींचा जागेवर निपटारा
अडावद (ता. चोपडा) | प्रतिनिधी : हर्षल पाटील
अडावद येथील क्षत्रिय माळी समाज मंगल कार्यालयात राज्य शासनाच्या ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर अभियान’ अंतर्गत चोपडा तालुक्यातील अडावद मंडळातील नऊ गावांसाठी एकत्रित महसूल व सर्वसमावेशक शासकीय सेवा शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून, सुमारे २ हजार ते २ हजार ३०० हून अधिक लाभार्थ्यांनी विविध शासकीय योजनांचा थेट लाभ घेतला.
ढोल-ताशांच्या गजरात स्वागत
शिबिराचे उद्घाटन आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रारंभी शामराव येसो महाजन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी लेझीम पथक आणि ढोल-ताशांच्या गजरात आमदारांचे स्वागत केले.
यानंतर छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतीराव फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
तक्रारींचा जागेवरच निपटारा
शिबिरामध्ये घरकुल योजना, रेशन पुरवठा विभाग आणि संजय गांधी निराधार योजनेबाबत सर्वाधिक तक्रारी प्राप्त झाल्या. नागरिकांनी आपल्या अडचणी थेट आमदारांसमोर मांडल्या. यावेळी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांनी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना तत्काळ बोलावून अनेक तक्रारींचा जागेवरच निपटारा केला. त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त करत आमदारांचे आभार मानले.
विविध योजनांचा लाभ व रक्तदान शिबिर
शिबिरात विविध शासकीय विभागांचे माहिती व सेवा स्टॉल उभारण्यात आले होते. आमदारांनी सर्व स्टॉलना भेट देऊन कामकाजाचा आढावा घेतला व आवश्यक सूचना दिल्या.
यावेळी बचत गट, कर्जमाफी, शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबे, आयुष्मान भारत कार्ड, दिव्यांग, निराधार व वैयक्तिक लाभाच्या विविध योजनांतील लाभार्थ्यांना धनादेश व प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. तसेच प्रातिनिधिक स्वरूपात एक गहू काढणी मशीन आणि दोन ट्रॅक्टरचे वाटप करण्यात आले.
आरोग्य विभागाच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरालाही नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमाच्या शेवटी मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करून शिबिराची सांगता करण्यात आली.
मान्यवरांची उपस्थिती
या शिबिराला अमळनेरचे उपविभागीय अधिकारी मयूर भंगाळे, तहसीलदार भाऊसाहेब थोरात, गटविकास अधिकारी अंजली गर्गे, पोलीस निरीक्षक पवन देसले, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत कंडारे, पोलीस उपनिरीक्षक सचिन नागरे, नायब तहसीलदार योगेश पाटील, तालुका कृषी अधिकारी रामचंद्र पाटील यांच्यासह कृषी, आरोग्य, महसूल, भूमी अभिलेख, वन, पशुसंवर्धन, महिला व बालविकास, शिक्षण आदी विभागांचे अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते
