सायबर चोरांपासून सावध राहा! WhatsApp वर अज्ञात फाइल्स डाऊनलोड करणे ठरू शकते महाग
‘View Details’, ‘Invoice’ किंवा ‘Document’ नावाच्या संशयास्पद फाइल्सपासून दूर राहा; महाराष्ट्र शासनाचे नागरिकांना सतर्कतेचे आवाहन
विशेष प्रतिनिधी
ऑनलाइन फसवणुकीच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासन आणि ‘आपले सरकार’ यांच्या वतीने नागरिकांसाठी महत्त्वपूर्ण सायबर सुरक्षा सूचना (Cyber Advisory) जारी करण्यात आली आहे. सायबर गुन्हेगार आता WhatsApp च्या माध्यमातून नागरिकांच्या मोबाईलमध्ये अनधिकृत प्रवेश मिळवून आर्थिक फसवणूक करत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
अशी केली जाते फसवणूक
सायबर भामटे WhatsApp वर “View Details”, “Invoice” किंवा “Document” अशा आकर्षक नावांनी ZIP फोल्डर किंवा इतर फाइल्स पाठवतात. या फाइल्समध्ये प्रामुख्याने .exe किंवा .dll प्रकारच्या धोकादायक फाइल्स असतात.
नागरिकांनी अशा फाइल्स उघडल्या किंवा इन्स्टॉल केल्यास सायबर गुन्हेगार मोबाईल व WhatsApp खात्यावर अनधिकृत ताबा मिळवू शकतात. त्यानंतर संबंधित व्यक्तीच्या संपर्क यादीतील मित्र, नातेवाईक किंवा परिचितांना फसवे संदेश पाठवून पैशांची मागणी केली जाते आणि आर्थिक फसवणूक केली जाते.
नागरिकांनी घ्यावयाची काळजी
महाराष्ट्र शासनाने नागरिकांना पुढील बाबींचे पालन करण्याचे आवाहन केले आहे:
- WhatsApp वर अनोळखी क्रमांकावरून आलेल्या .exe किंवा .dll फाइल्स कधीही उघडू किंवा इन्स्टॉल करू नयेत.
- “View Details”, “Invoice” किंवा “Document” नावाने आलेल्या संशयास्पद ZIP फाइल्स किंवा लिंक्सवर क्लिक करणे टाळावे.
- अनोळखी स्रोतांमधून (Unknown Sources) कोणतेही अॅप किंवा फाइल डाऊनलोड करू नये.
- मित्र किंवा नातेवाईकांच्या नावाने अचानक पैशांची मागणी करणारा संदेश आल्यास, पैसे पाठविण्यापूर्वी संबंधित व्यक्तीशी थेट फोनवर संपर्क साधून खात्री करावी.
- मोबाईल आणि WhatsApp अॅप नेहमी अधिकृत स्रोतांवरून अद्ययावत (Update) ठेवावे.
सतर्क राहा, सुरक्षित राहा
सायबर गुन्हेगार सातत्याने नवीन पद्धती वापरत असल्याने इंटरनेट आणि सोशल मीडियाचा वापर करताना प्रत्येक नागरिकाने दक्षता बाळगणे आवश्यक आहे. कोणतीही संशयास्पद लिंक, फाइल किंवा संदेश आल्यास त्याकडे दुर्लक्ष करावे आणि आवश्यक असल्यास संबंधित यंत्रणेला माहिती द्यावी, असे आवाहन महाराष्ट्र शासनाने केले आहे.
