चावरा वंडर किड्स, खोटे नगर येथे आषाढी एकादशी उत्साहात साजरी
पारंपरिक वेशभूषा, ढोल-लेझीम पथक आणि भक्तीमय वातावरणात कार्यक्रम संपन्न
जळगाव प्रतिनिधी
जळगाव येथील ‘चावरा वंडर किड्स, खोटे नगर’ शाखेत आषाढी एकादशीचा उत्सव भक्तिमय वातावरणात आणि मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक फादर जॉबी, फादर जिरिन, तसेच शिक्षिका योगिता पवार, पूनम चौधरी, स्वाती पाटील, चित्रा कोळी, राधिका मॅडम, रूपाली मॅडम आणि प्रियांका मॅडम उपस्थित होत्या. तसेच कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नॉन-टीचिंग स्टाफने विशेष सहकार्य केले.
कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरलेल्या छोट्या विद्यार्थ्यांनी पारंपरिक महाराष्ट्रीयन वेशभूषा परिधान करून वारकरी संप्रदायाची संस्कृती जिवंत केली. टाळ व मृदंगाच्या गजरात विद्यार्थ्यांनी भक्तिमय नृत्य सादर करत उत्साहात प्रभातफेरी काढली. विद्यार्थ्यांच्या शिस्तबद्ध सहभागामुळे संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला.
या सोहळ्याची शोभा वाढवण्यासाठी चावरा इंटरनॅशनल स्कूल, तरसोद येथील ढोल पथक आणि विद्यार्थिनींच्या लेझीम पथकाने अत्यंत आकर्षक सादरीकरण केले. या दोन्ही पथकांना भरत सर आणि तुषार सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले, ज्याच्या बळावर विद्यार्थ्यांनी अप्रतिम कामगिरी करत उपस्थितांची मने जिंकली.
या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आपली संत परंपरा, वारकरी संस्कृती आणि आषाढी एकादशीचे धार्मिक व सांस्कृतिक महत्त्व सविस्तर समजवून देण्यात आले. उपस्थित पालक व नागरिकांनी या सुंदर उपक्रमाचे भरभरून कौतुक करत शाळेचे अभिनंदन केले.
