विद्यार्थ्यांच्या मराठी-इंग्रजीतील प्रभावी भाषणांनी जिंकली उपस्थितांची मने; महान व्यक्तींच्या विचारांचा जागर
भडगाव | प्रतिनिधी (गणेश रावळ)
लाडकुबाई प्राथमिक विद्यामंदिर, भडगाव येथे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी भाषण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. राष्ट्रप्रेम, सामाजिक जाणीव, वक्तृत्वकला आणि थोर व्यक्तींच्या विचारांचा वारसा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने आयोजित हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक कमलेश शिंदे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन किरण पाटील व ज्ञानेश्वर गांगुर्डे यांनी केले. यावेळी इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी लोकमान्य टिळक आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनकार्यावर मराठी तसेच इंग्रजी भाषेत प्रभावी भाषणे सादर केली. विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने मांडलेल्या विचारांना उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली. विशेषतः इंग्रजी भाषेतील काही विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
कार्यक्रमादरम्यान लोकमान्य टिळक यांच्या राष्ट्रभक्ती, स्वराज्याच्या विचारांची तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्य, सामाजिक कार्य आणि परिवर्तनवादी विचारांची विद्यार्थ्यांना प्रेरणादायी ओळख करून देण्यात आली. महान व्यक्तींच्या कार्यातून विद्यार्थ्यांनी आदर्श घेऊन समाजाप्रती जबाबदारीची भावना जोपासावी, असा संदेश यावेळी देण्यात आला.
कार्यक्रमाचे छायाचित्रण सुयोग पाटील व हर्षल पाटील यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संगीता शेलार, सुनीता देवरे, अनिता सैंदाणे, अनंत हिरे, ज्ञानेश्वर गांगुर्डे, सुयोग पाटील, हरिचंद्र पाटील आणि किरण पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले.
विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग, शिक्षकांचे नियोजन आणि प्रेरणादायी वातावरणामुळे हा कार्यक्रम संस्मरणीय ठरला. उपस्थितांनी महान व्यक्तींच्या विचारांचा वारसा जपत विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकी, देशप्रेम आणि वक्तृत्व कौशल्य विकसित करण्याच्या शाळेच्या उपक्रमाचे कौतुक केले.
