मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थींना भरतीत प्राधान्य द्या; अन्यथा १४ ऑगस्टपासून आमरण उपोषणाचा इशारा
धुळे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन; शासकीय, निमशासकीय व आउटसोर्सिंग भरतीत प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांना संधी देण्याची मागणी
धुळे | प्रतिनिधी :
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थींना शासकीय, निमशासकीय कार्यालये तसेच आउटसोर्सिंग (कंत्राटी) भरती प्रक्रियेत प्राधान्य देण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी श्री संत बागडे बाबा मानव मित्र संघटना, महाराष्ट्र राज्य आणि युवा प्रशिक्षणार्थी संघटना, साक्री तालुका यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर करण्यात आले. शासनाने योजनेअंतर्गत प्रशिक्षण दिलेल्या युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, राज्यातील सांगली, जालना, रायगड आणि जळगाव या जिल्ह्यांमध्ये प्रशिक्षणार्थींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक आदेश जारी करण्यात आले आहेत. त्याच धर्तीवर धुळे जिल्ह्यातही संबंधित विभागांनी योग्य निर्णय घेऊन प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांना भरती प्रक्रियेत प्राधान्य द्यावे.
संघटनेच्या प्रतिनिधींनी शासनाच्या ९ जुलै २०२४ रोजीच्या शासन निर्णयाचा उल्लेख करत, प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांना संबंधित उद्योग, संस्था आणि आस्थापनांमध्ये रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याची स्पष्ट तरतूद असल्याचे निदर्शनास आणून दिले. मात्र, धुळे जिल्ह्यात या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याचा आरोपही निवेदनातून करण्यात आला.
प्रशिक्षण पूर्ण करूनही अनेक युवकांना नोकरीच्या संधी मिळत नसल्याने त्यांच्यात नाराजीचे वातावरण आहे. शासनाने प्रशिक्षणासाठी वेळ, मनुष्यबळ आणि निधी खर्च करूनही संबंधित उमेदवारांना रोजगारात प्राधान्य मिळत नसल्यास योजनेचा उद्देशच अपूर्ण राहील, असे संघटनेने म्हटले आहे.
धुळे जिल्ह्यातील विविध शासकीय, निमशासकीय तसेच कंत्राटी भरती प्रक्रियेत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील पात्र प्रशिक्षणार्थींना प्राधान्य देण्याबाबत स्पष्ट आदेश काढावेत, अशी मागणीही करण्यात आली आहे.
दरम्यान, या मागणीवर तातडीने सकारात्मक निर्णय न झाल्यास १४ ऑगस्ट २०२६ पासून श्री संत बागडे बाबा मानव मित्र संघटनेच्या नेतृत्वाखाली प्रशिक्षणार्थी आमरण उपोषण सुरू करतील, असा इशाराही निवेदनातून प्रशासनाला देण्यात आला आहे.
यावेळी भरत पवार, सुरज गावित, गणेश भामरे, सविता अहिरे, विजय माळी, धर्मा पिपळे, मुकेश कोळी, भास्कर पगारे, चेतन पाटील, आनंद पवार, सोनाली ठाकूर, अनिता कुंवर, सुप्रिया भामरे आदी प्रशिक्षणार्थी व संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. प्रशिक्षणार्थींना न्याय मिळावा आणि शासन निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, अशी अपेक्षा उपस्थितांनी व्यक्त केली.
