जळगाव स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई;
३० हजारांची चोरीची मोटरसायकल जप्त, रेकॉर्डवरील आरोपी जेरबंद
जळगाव | प्रतिनिधी
जळगाव जिल्ह्यात वाढत्या वाहन चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवाई करत ३० हजार रुपये किमतीची चोरीची मोटरसायकल जप्त केली असून, रेकॉर्डवरील आरोपीला अटक केली आहे.
पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी जिल्ह्यातील वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणून चोरीस गेलेली वाहने हस्तगत करण्याचे आदेश दिल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाने समांतर तपास सुरू केला होता.
तपासादरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, विभोर जुलाल जाधव (रा. एरंडोल, सध्या रा. विवरे खुर्द, ता. रावेर) याच्याकडे चोरीची हिरो एच.एफ. डिलक्स मोटरसायकल असल्याचे समोर आले. त्यानुसार पथकाने विवरे खुर्द येथे सापळा रचून संशयिताला ताब्यात घेतले.
चौकशीदरम्यान सुरुवातीला आरोपीने उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, कसून चौकशी केल्यानंतर त्याने जळगाव महानगरपालिकेच्या पार्किंगमधून मोटरसायकल चोरी केल्याची कबुली दिली.
पडताळणी केली असता MH-19-BT-9433 क्रमांकाची ही मोटरसायकल जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १९६/२०२३ अंतर्गत भारतीय दंड संहितेच्या कलम ३७९ नुसार दाखल वाहन चोरीच्या गुन्ह्यातील असल्याचे निष्पन्न झाले.
पोलीसांनी आरोपीकडून सुमारे ३० हजार रुपये किमतीची लाल-काळ्या रंगाची हिरो एच.एफ. डिलक्स मोटरसायकल जप्त केली आहे. आरोपीविरुद्ध यापूर्वीही घरफोडी व चोरीचे गुन्हे दाखल असून, इतर गुन्ह्यांतील सहभागाबाबतही तपास सुरू आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे, पोलीस हवालदार लक्ष्मण पाटील, पोलीस नाईक राहुल पाटील, जितेंद्र पाटील, भूषण पाटील आणि राहुल महाजन यांच्या पथकाने केली.
