नगरदेवळा येथे वीर जवान भैय्यासाहेब बागुल स्मारकाचे भूमिपूजन;
‘वीर माती संकलन’ सोहळा भावपूर्ण वातावरणात संपन्न
नगरदेवळा बु. | प्रतिनिधी
देशासाठी सर्वोच्च बलिदान देणारे वीर जवान शहीद भैय्यासाहेब रोहीदास बागुल यांच्या स्मारकाचे भूमिपूजन आणि ‘वीर माती संकलन’ सोहळा नगरदेवळा बु. येथे भावपूर्ण वातावरणात पार पडला. शहीद जवानांच्या स्मृती जतन करून भावी पिढीमध्ये देशभक्तीची प्रेरणा जागविण्याच्या उद्देशाने आयोजित या कार्यक्रमाला ग्रामस्थ, माजी सैनिक आणि प्रशासनातील अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राज्य शासनाने जळगाव जिल्ह्यातील २९ गावांमध्ये शहीद स्मारके उभारण्यासाठी ४ कोटी ३५ लाख रुपयांचा निधी मंजूर केला असून, प्रत्येक स्मारकासाठी १५ लाख रुपये उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या उपक्रमासाठी आमदार किशोर (आप्पा) पाटील यांनी पाठपुरावा केला होता.
तहसीलदार विजय बनसोडे यांची संवेदनशील भूमिका
कार्यक्रमादरम्यान संकलित करण्यात आलेली ‘वीर माती’ त्याच दिवशी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात जमा करणे आवश्यक होते. वेळेअभावी ही जबाबदारी कशी पूर्ण करावी, असा प्रश्न निर्माण झाल्यानंतर तहसीलदार विजय बनसोडे यांनी स्वतः पुढाकार घेत माती जळगाव येथील सैनिक कल्याण कार्यालयात पोहोचवली. त्यांच्या या कृतीचे ग्रामस्थ, माजी सैनिक आणि उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत केले.
“शहीदांच्या आठवणी जपणे अभिमानाची बाब”
यावेळी बोलताना तहसीलदार विजय बनसोडे यांनी नगरदेवळा ग्रामस्थांचे कौतुक करत, २६ वर्षांनंतरही शहीद भैय्यासाहेब बागुल यांच्या स्मृती जतन केल्या जात असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. सैनिकांच्या त्यागामुळेच देश सुरक्षित असून, त्यांच्या बलिदानाचा सन्मान प्रत्येकाने जपला पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
“बलिदानाची प्रेरणा आजही जिवंत”
आजी-माजी सैनिक संघाचे प्रमुख ऑनररी कॅप्टन ज्ञानेश्वर महाजन यांनी शहीद भैय्यासाहेब बागुल यांच्या शौर्याची आठवण करून देताना सांगितले की, देशरक्षणासाठी त्यांनी ३० गोळ्या झेलत सर्वोच्च बलिदान दिले. त्यांच्या प्रेरणेने आज नगरदेवळा गावातील अनेक युवक भारतीय सैन्यात भरती होऊन देशसेवा करत आहेत.
माजी सैनिकांच्या समस्या जाणून घेतल्या
कार्यक्रमानंतर तहसीलदार विजय बनसोडे यांनी माजी सैनिकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. संबंधित प्रश्न प्राधान्याने सोडविण्यासाठी प्रशासनाला आवश्यक सूचना देण्यात आल्या.
मान्यवरांची उपस्थिती
कार्यक्रमाला शहीद जवानांच्या वीरमाता तुळसाबाई रोहीदास बागुल, सरपंच किरण काटकर, मंडळ अधिकारी राहुल पवार, ग्राम महसूल अधिकारी तात्याराव सपकाळ, बबन मंडले, उमेश सोनवणे, ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी, माजी सैनिक तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शहीद स्मारक उभारणीमुळे भावी पिढीमध्ये देशभक्तीची प्रेरणा अधिक दृढ होईल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.
