साक्री पोलिसांची मोठी कारवाई;
२ लाख ३ हजारांचा एमडी व डोडा अंमली पदार्थ जप्त, एकाला अटक
धुळे | प्रतिनिधी
अंमली पदार्थांच्या अवैध विक्री व वाहतुकीवर नियंत्रण मिळवण्यासाठी धुळे पोलिसांनी सुरू केलेल्या मोहिमेत साक्री पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी सुमारे २ लाख ३ हजार २५ रुपये किमतीचा एमडी (मेफेड्रॉन) व डोडा (पॉपी स्ट्रॉ) अंमली पदार्थांचा साठा जप्त करून एका आरोपीला अटक केली आहे.
पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी धुळे जिल्ह्यात चोरीचे गुन्हे, अंमली पदार्थांची वाहतूक व अन्य गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी प्रभावी गस्त व कारवाई करण्याचे निर्देश सर्व पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांना दिले आहेत.
त्यानुसार, ४ ऑगस्ट २०२६ रोजी साक्री पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक दिपक वळवी यांना गोपनीय माहिती मिळाली की, शेवाळी (ता. साक्री) गाव शिवारातील एच.पी. पेट्रोल पंपाजवळील हॉटेल सतलज येथे एक इसम एमडी (मेफेड्रॉन) हा अंमली पदार्थ विक्री करण्याच्या उद्देशाने बाळगून आहे.
माहिती मिळताच पोलीस निरीक्षक दिपक वळवी यांनी पथक तयार करून संबंधित ठिकाणी रवाना केले. पथकाने हॉटेल सतलज परिसरात जाऊन माहितीची खात्री केली असता, एक इसम पोलिसांना पाहून संशयास्पद हालचाली करताना दिसून आला. तो काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करत असल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.
चौकशी केली असता त्याने आपले नाव राजकुमार मुल्कराज वाल्मीकी (वय ४२ वर्षे, रा. मुक्तासर रोड, कोटकपूर, फरीदकोट, पंजाब; सध्या रा. इंद्रा कॉलनी, वॉर्ड क्रमांक १, फिरोजपूर छावणी, पंजाब) असे सांगितले.
आरोपीची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे खालील अंमली पदार्थ आढळून आले—
-
१८ ग्रॅम वजनाची तपकिरी रंगाची एमडी (मेफेड्रॉन) पावडर
-
१.३७७ किलो वजनाचा डोडा (पॉपी स्ट्रॉ) अंमली पदार्थ
-
०.१५८ ग्रॅम डोडा पावडर
असा एकूण २,०३,०२५ रुपये किमतीचा अंमली पदार्थांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
याप्रकरणी आरोपी राजकुमार मुल्कराज वाल्मीकी याच्याविरुद्ध साक्री पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक २३२/२०२६ अन्वये गुंगीकारक औषधी द्रव्ये आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ मधील कलम ८(क), १५(क), २२(ब), २९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास साक्री पोलीस करीत आहेत.
