धुळ्यातील १३ गुन्ह्यांमधील साडेबारा कोटींचे ९,५३६ किलो अमली पदार्थ नष्ट
‘नशा मुक्त भारत अभियान’ अंतर्गत पुण्यात पर्यावरणपूरक पद्धतीने विल्हेवाट; झिरो टॉलरन्स धोरणानुसार कारवाई
धुळे | प्रतिनिधी
‘नशा मुक्त भारत अभियान’ अंतर्गत धुळे जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असलेल्या १३ गुन्ह्यांतील सुमारे १२.५० कोटी रुपयांचा ९,५३६ किलो अमली पदार्थांचा साठा कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून पर्यावरणपूरक पद्धतीने पुणे येथे नष्ट करण्यात आला. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही कारवाई पार पडली.

भारत सरकारच्या ‘नशा मुक्त भारत अभियान’ अंतर्गत देशाला अमली पदार्थ आणि व्यसनाधीनतेपासून मुक्त करण्यासाठी विविध स्तरांवर विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून धुळे पोलिसांनी जप्त केलेल्या अमली पदार्थांची नियमानुसार विल्हेवाट लावण्यात आली.
धुळे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री यांच्या बेकायदेशीर अमली पदार्थांविरोधातील ‘झिरो टॉलरन्स’ धोरणानुसार राज्यभर विशेष मोहीम अधिक तीव्र करण्यात आली असून, अमली पदार्थांची तस्करी, साठवणूक आणि विक्री करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई सुरू आहे.
पोलीस प्रशासनाने नागरिकांनाही अमली पदार्थांच्या गैरव्यवहाराबाबत माहिती मिळाल्यास तत्काळ पोलिसांना कळविण्याचे आवाहन केले असून, समाजाला व्यसनमुक्त करण्यासाठी नागरिकांच्या सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.
