‘झिरो लोडशेडिंग’च्या नावाखाली वीजपुरवठा खंडित; भुसावळकरांचा संताप!
पूजा कॉम्प्लेक्स व पांडुरंगनाथ नगर परिसरातील वीज समस्येवर कारवाईची मागणी; राज्य पत्रकार संघटनेचे तालुकाध्यक्ष संघरत्न सपकाळे यांचे कार्यकारी अभियंत्यांना निवेदन
भुसावळ : प्रतिनिधी
भुसावळ शहरातील पूजा कॉम्प्लेक्स परिसर, पांडुरंगनाथ नगर तसेच अन्य भागांत ‘झिरो लोडशेडिंग’च्या नावाखाली वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याचा आरोप करत संबंधित अधिकाऱ्यांच्या कारभारावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. या प्रकारामुळे सामान्य नागरिक, वयोवृद्ध आणि रात्रीच्या वेळी घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटनेचे भुसावळ तालुकाध्यक्ष संघरत्न सपकाळे यांनी यासंदर्भात महावितरणचे कार्यकारी अभियंता सोनावले यांना निवेदन दिले. पूजा कॉम्प्लेक्स परिसर आणि पांडुरंगनाथ नगर हा भाग शिवाजीनगर युनिटअंतर्गत येतो. या परिसरातील वीजग्राहक नियमितपणे वीजबिल भरत असतानाही वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
रात्रीच्या अंधारामुळे सुरक्षेचा प्रश्न
वीजपुरवठा अचानक खंडित झाल्याने नागरिकांची गैरसोय होते. विशेषतः रात्रीच्या वेळी वीज नसल्यामुळे अंधार पसरतो आणि परिसरातील नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होतो. अशा परिस्थितीत चोरीसारखी घटना घडल्यास त्याची जबाबदारी कोणाची, असा सवालही संघरत्न सपकाळे यांनी उपस्थित केला आहे.
वीजखंडित करण्यापूर्वी पूर्वसूचना द्या!
‘झिरो लोडशेडिंग’च्या नावाखाली वीजपुरवठा बंद केला जात असल्यास ग्राहकांना त्याची पूर्वसूचना देणे आवश्यक आहे. संबंधित विभागाने वीजपुरवठा बंद ठेवण्याची वेळ, कारण आणि कालावधी याबाबत ग्राहकांना स्पष्ट माहिती द्यावी. तसेच आवश्यक असल्यास स्थानिक वृत्तपत्रांमधूनही सूचना प्रसिद्ध करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
नागरिकांनी वीजपुरवठा खंडित होण्याचे कारण विचारल्यास संबंधित कर्मचाऱ्यांकडून वरिष्ठ स्तरावरून वीज बंद करण्यात आल्याचे किंवा ई-मेलद्वारे सूचना मिळाल्याचे सांगितले जाते, असा दावा निवेदनात करण्यात आला आहे. मात्र, वीजपुरवठा वारंवार खंडित करण्यामागील नेमके कारण आणि त्यासंबंधीचे अधिकृत वेळापत्रक ग्राहकांना स्पष्टपणे कळविले जात नसल्याची तक्रार करण्यात आली आहे.
मनमानी थांबवा, अन्यथा आंदोलनाचा इशारा
महावितरणने वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याच्या समस्येची तातडीने दखल घेऊन ग्राहकांना दिलासा द्यावा. ‘झिरो लोडशेडिंग’च्या नावाखाली सुरू असलेला कथित मनमानी कारभार थांबवावा आणि या पद्धतीबाबत अधिकृत स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी संघरत्न सपकाळे यांनी केली आहे.
या समस्येवर त्वरित तोडगा न निघाल्यास आगामी काळात मोठे जनआंदोलन उभारावे लागेल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. त्यामुळे महावितरणचे अधिकारी या तक्रारीची दखल घेऊन वीजपुरवठ्याबाबत स्पष्ट भूमिका मांडतात का, याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
