पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची ग्वाही; स्वतंत्र आर्थिक महामंडळासाठी पाठपुरावा करणार, गुणवंत विद्यार्थी व समाजरत्नांचा गौरव
धरणगावात कुंभार समाजाचा गुणगौरव सोहळा उत्साहात; शिक्षण, सामाजिक एकजूट, सामूहिक विवाह आणि गरीब मुलींच्या शिक्षणासाठी दातृत्व दाखविण्याचे पालकमंत्र्यांचे आवाहन
धरणगाव : प्रतिनिधी : “कुंभार समाज हा कष्टाळू, प्रामाणिक आणि कलासंपन्न समाज आहे. मातीला आकार देणाऱ्या हातांनी आता शिक्षण, कौशल्य आणि उद्योगाच्या बळावर नव्या पिढीचे भविष्य घडवावे. समाजाच्या प्रगतीसाठी एकजूट महत्त्वाची असून, कुंभार समाजाच्या विकासासाठी मी सदैव पाठीशी आहे. माझे दरवाजे कायम खुले आहेत,” अशी ग्वाही राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली.
धरणगाव येथे आयोजित तालुका कुंभार समाज विद्यार्थी गुणगौरव व सामाजिक पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी गुणवंत विद्यार्थी, आदर्श माता-पिता, समाजभूषण आणि विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.
आर्थिक महामंडळासाठी शासनस्तरावर पाठपुरावा
पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, संत गोरोबाकाकांचा कष्ट, प्रामाणिकपणा आणि माणुसकीचा वारसा जपत समाजाने पारंपरिक कलेला आधुनिकतेची जोड द्यावी. शिक्षण आणि कौशल्यविकासाच्या माध्यमातून नव्या संधींचा लाभ घ्यावा. गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान हा केवळ त्यांच्या यशाचा नव्हे, तर त्यासाठी त्याग करणाऱ्या आई-वडिलांचाही गौरव आहे.
समाजाच्या पारंपरिक व्यवसायातील अडचणी सोडविण्यासाठी आपण कटिबद्ध असून, कुंभार समाजासाठी स्वतंत्र आर्थिक महामंडळ स्थापन करण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. धरणगाव, नशिराबाद, चांदसर, कानळदा आणि भादली यांसह विविध ठिकाणी समाजबांधवांच्या सहकार्याने मंगल कार्यालये व सामाजिक सभागृहांच्या उभारणीसाठी काम केल्याचाही त्यांनी उल्लेख केला.
समाजाने सामूहिक विवाहांना प्रोत्साहन देऊन अनावश्यक खर्च टाळावा. सक्षम व्यक्तींनी पुढाकार घेत गरीब मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारावी, असे आवाहनही त्यांनी केले.
आदर्श माता-पित्यांसह समाजरत्नांचा गौरव
सोहळ्यात आदर्शमाता पुरस्काराने बायजाबाई कुंभार आणि लीलाबाई कुंभार यांना गौरविण्यात आले. आदर्श माता-पिता पुरस्कार शांताबाई व दाजीराम कुंभार यांना, तर आदर्श सरपंच पुरस्कार मनीषा कुंभार यांना प्रदान करण्यात आला.
आदर्श समाजभूषण पुरस्काराने एकनाथ कुंभार, रमेश गायकवाड आणि मोहन कुंभार यांचा, तर समाजभूषण पुरस्काराने माजी सैनिक त्रिंबराव कुंभार यांचा सन्मान करण्यात आला. कर्मयोगी पुरस्कार संदीप सोनवणे यांना प्रदान करण्यात आला. याशिवाय समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला. पुरस्कारप्राप्त मान्यवरांचे अभिनंदन करून त्यांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
समाजाच्या प्रलंबित प्रश्नांकडे लक्ष वेधले
कुंभार समाज सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सतीश दरेकर यांनी समाजाच्या वाटचालीचा आढावा घेत आर्थिक उन्नतीसाठी स्वतंत्र आर्थिक महामंडळ स्थापन करण्याची मागणी केली. प्रदेशाध्यक्ष रमाकांत क्षीरसागर यांनी पेसा कायदा आणि रॉयल्टीसंदर्भातील सुमारे ४० वर्षांपासून प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी पालकमंत्र्यांनी केलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले. “गुलाबराव पाटील हे आमच्यासाठी केवळ मंत्री नसून हक्काचे माणूस आहेत,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
राज्यभरातील पदाधिकाऱ्यांची उपस्थिती
यावेळी प्रदेशाध्यक्ष रमाकांत क्षीरसागर, विभागीय अध्यक्ष रतनलाल कुंभार, रतिलाल कुंभार, जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर कापडे, प्रदेश उपाध्यक्ष गोकुळ कुंभार, बबनराव जगदाळे, गणेश हरणकर, जगदीश मोरे, अनेक शेख, पुणे जिल्हाध्यक्ष सत्यवान वाळके यांच्यासह राज्यभरातील पदाधिकारी, धरणगाव तालुक्यातील पदाधिकारी व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर कापडे यांनी समाजाचे विविध उपक्रम आणि आयोजनामागील उद्देश विशद केला. सूत्रसंचालन निवेदिका पूजा नेमाडे व जिल्हा सचिव सखाराम मोरे यांनी केले, तर आभार तालुका सचिव भगवान कुंभार यांनी मानले.
