ममुराबाद : सेवा पंधरवाड्याच्या निमित्ताने ममुराबाद येथील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्रांचे वाटप करून त्यांचे कौतुक करण्यात आले.
सेवा पंधरवाडा हा समाजसेवा, जनजागृती, लोकसहभाग आणि राष्ट्रहिताच्या कार्याला प्रोत्साहन देणारा उपक्रम आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांपर्यंत सेवाभावी कार्य पोहोचविणे, विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव निर्माण करणे तसेच त्यांच्यातील सुप्त कलागुणांना वाव देणे हा महत्त्वाचा उद्देश आहे. याच भावनेतून शाळेत चित्रकला व वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. चित्रकलेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी आपली सर्जनशीलता व्यक्त केली, तर वक्तृत्व स्पर्धेतून विचार मांडण्याची कला, आत्मविश्वास आणि संभाषण कौशल्य विकसित करण्यास प्रोत्साहन मिळाले.
या कार्यक्रमाला भारतीय जनता पार्टी जळगाव पश्चिम जिल्हाध्यक्ष माननीय डॉ. राधेश्यामजी चौधरी, जिल्हा महामंत्री माननीय राजेंद्र सोनवणे, कामगार मोर्चाचे जिल्हाध्यक्ष महेश पाटील, आयटी सेल जिल्हाध्यक्ष वासुदेव कोळी, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष लखिचंद कोळी, बजरंग दलाचे माजी तालुकाध्यक्ष सुहास पाटील, भाजपा जिल्हा चिटणीस गोरख कोळी, समन्वय समिती सदस्य तुळशीराम सोनवणे, बूथ प्रमुख राजेंद्र पाटील आणि ग्रामपंचायतीचे वरिष्ठ लिपिक ज्ञानेश्वर सावळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक किशोर सोनवणे, केंद्रप्रमुख प्रणिता पाटील मॅडम, वरिष्ठ शिक्षिका प्रतिभा तायडे, शिक्षक अरुण संधान तसेच शाळेतील सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे कौतुक करण्यात आले तसेच शिक्षणासोबतच कला, वक्तृत्व, आत्मविश्वास आणि सामाजिक जाणीव यांना महत्त्व देण्याचे आवाहन करण्यात आले. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला चालना मिळते आणि त्यांच्यातील सुप्त गुणांना योग्य व्यासपीठ उपलब्ध होते, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप पाटील सर यांनी केले. शाळेतील शिक्षकवृंद आणि उपस्थित मान्यवरांच्या सहकार्याने कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
सेवा पंधरवाड्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणारा हा उपक्रम शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक मूल्यांची जपणूक करणारा ठरला.
