विविध समस्यांबाबत धडगावच्या तहसीलदारांना निवेदन; १५ दिवसांत कार्यवाही न झाल्यास लोकशाही मार्गाने आंदोलनाचा इशारा
धडगाव प्रतिनिधी : तालुक्यातील खडकला बुद्रुक गावातील प्रलंबित वनहक्क दावे निकाली काढून पात्र शेतकऱ्यांना वनहक्क पट्टे द्यावेत, तसेच दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन शेतकऱ्यांचे पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी, अशा विविध मागण्यांचे निवेदन खडकला बुद्रुक येथील शेतकरी व ग्रामस्थांनी धडगावच्या तहसीलदारांना दिले.
गावातील शेतकरी अनेक पिढ्यांपासून जमिनी कसत असून, शेती हाच त्यांच्या उदरनिर्वाहाचा मुख्य आधार आहे. अनेक वर्षांपूर्वी वनहक्क दावे दाखल करूनही अद्याप गावातील एकाही शेतकऱ्याला वनहक्क पट्टा मिळालेला नसल्याची बाब निवेदनातून मांडण्यात आली आहे. यासाठी जुन्या सातबारा उताऱ्यांसह सन १९८६ च्या आदेशासारखे विविध पुरावे उपलब्ध असल्याचेही ग्रामस्थांनी नमूद केले आहे.
सध्या गावात दुष्काळी परिस्थिती असतानाही शेतकऱ्यांचे पंचनामे झाले नसल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली. वनपट्टे नसल्याचे कारण देऊन पंचनामे टाळण्यात येऊ नयेत. उपलब्ध कागदपत्रांची पडताळणी करून पात्र शेतकऱ्यांचे पंचनामे करावेत व नियमानुसार नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
यासोबतच गावातील पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई दूर करण्यासाठी जलजीवन मिशनची कामे तातडीने पूर्ण करावीत, तसेच खडकला बुद्रुक घाट रस्त्याची झालेली दुरवस्था लक्षात घेऊन रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे. वनपट्ट्यांअभावी विहिरींसह इतर शासकीय योजनांचा लाभ घेताना येणाऱ्या अडचणी दूर करून पात्र लाभार्थ्यांना नियमानुसार लाभ द्यावा, असेही ग्रामस्थांनी म्हटले आहे.
#गेल्या अनेक वर्षांपासून आमच्या गावातील शेतकऱ्यांनी वनहक्क दावे दाखल केले आहेत. मात्र, अद्याप हे दावे निकाली निघालेले नाहीत. वनपट्टे नसल्याचे कारण देऊन आम्हाला पीकविमा, विहिरींसह विविध शासकीय योजनांच्या लाभापासून वंचित ठेवले जात आहे.वनहक्क दावे वेळेत निकाली काढणे ही संबंधित विभागाची जबाबदारी आहे;त्यात शेतकऱ्यांचा काय दोष प्रशासनाच्या दिरंगाईची शिक्षा शेतकऱ्यांना का भोगावी लागावी आमच्याकडे उपलब्ध असलेल्या शेतीविषयक पुराव्यांची पडताळणी करून पात्र शेतकऱ्यांना शासकीय योजनांचा लाभ द्यावा, दुष्काळी पंचनामे करावेत आणि गावातील इतर प्रलंबित समस्या तातडीने मार्गी लावाव्यात, हीच आमची मागणी आहे.
ग्रामस्थांच्या मागण्यांवर पुढील १५ दिवसांत संबंधित प्रशासनाने गांभीर्याने दखल घेऊन ठोस कार्यवाही करावी. अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्याचा निर्णय घ्यावा लागेल, असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.
यावेळी उपस्थित : दिलीप पावरा, तेरसिंग पावरा, विक्रम पटले, रामदास पावरा, रमेश पटले, गोविंद पावरा, किशोर पावरा, रावजी पटले, सुनील पावरा आणि दारासिंग पावरा यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
