पी.आर. हायस्कूल साजरी करणार ‘वाचन दिवाळी’; ५० विद्यार्थ्यांना सुबोध दिवाळी अंकाचे मोफत वितरण
मोबाईलच्या आभासी जगापासून विद्यार्थ्यांना वाचनाकडे वळविण्याचा स्तुत्य उपक्रम; ‘पढेंगे तो बढेंगे’ अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद
धरणगाव | प्रतिनिधी
ग्रामीण भागातील वंचित विद्यार्थ्यांना अवांतर वाचनाची गोडी लागावी आणि त्यांच्यामध्ये वाचन संस्कृती रुजावी, या उद्देशाने धरणगाव येथील पी.आर. हायस्कूलने ‘पढेंगे तो बढेंगे’ अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना सुबोध ग्रामीण दिवाळी अंकांचे मोफत वितरण केले. या उपक्रमाला विद्यार्थी आणि पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यंदाचा दीपोत्सव ‘वाचन दिवाळी’ म्हणून साजरा करण्याचा संकल्पही यावेळी व्यक्त करण्यात आला.
ज्ञानप्रबोधिनी आणि छात्र प्रबोधन, पुणे यांच्या माध्यमातून वाचन संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने प्रबोधनदूत डॉ. बापू शिरसाठ यांच्या पुढाकाराने पी.आर. हायस्कूलमध्ये कुमारवयीन विद्यार्थ्यांसाठी सुबोध ग्रामीण दिवाळी अंकांचे वितरण करण्यात आले. इयत्ता पाचवी ते सातवीतील ५० विद्यार्थ्यांना हे अंक विनामूल्य देण्यात आले.
वाचनातून विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता विकसित करण्याचा प्रयत्न
या कार्यक्रमाला संस्थाध्यक्ष डॉ. अरुण कुलकर्णी, सचिव डॉ. मिलिंद डाहाळे, डॉ. पद्मिनी डाहाळे, शाळेचे मुख्याध्यापक डी. एस. पाटील, पर्यवेक्षक ज्ञानेश्वर कोळी आणि ज्येष्ठ शिक्षिका डॉ. वैशाली गालापुरे उपस्थित होते.
सध्या मोबाईलचा वापर समाजजीवनात मोठ्या प्रमाणात वाढत असून, विद्यार्थी वाचनापासून दूर जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ही बाब लक्षात घेऊन शासनाकडून ‘महावाचन’, ‘वाचन प्रेरणा दिन’ यांसारखे उपक्रम राबविले जात आहेत. पी.आर. हायस्कूलनेही महावाचन उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला असून, त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासपूरक अवांतर वाचनाची आवड वाढत असल्याचे सांगण्यात आले.
मोबाईलच्या आभासी जगाऐवजी पुस्तकांची सोबत
यावेळी प्रबोधनदूत डॉ. बापू शिरसाठ यांनी सांगितले की, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची ज्ञानग्रहण क्षमता आणि बौद्धिक विकास वाढविण्यासाठी वाचन संस्कृतीला प्रोत्साहन देणे ही काळाची गरज आहे. आजच्या स्पर्धात्मक युगात ग्रामीण भागातील विद्यार्थी कुठेही मागे राहू नयेत, यासाठी त्यांना अवांतर वाचनाची सवय लागली पाहिजे. मोबाईलच्या आभासी जगाचा अतिरिक्त वापर कमी करून विद्यार्थ्यांनी पुस्तकांशी मैत्री करावी, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे. यंदाची दिवाळी फटाक्यांऐवजी वाचनाच्या आनंदातून साजरी व्हावी, या भावनेतून सुबोध दिवाळी अंकांचे मोफत वितरण करण्यात आले.
दिवाळी अंक उपलब्ध करून देणाऱ्यांचे आभार
दिवाळी अंक वेळेत उपलब्ध करून दिल्याबद्दल छात्र प्रबोधनचे संपादक महेंद्रभाई सेठिया, कार्यकारी संपादिका शिल्पा कुलकर्णी, व्यवस्थापकीय समन्वयक रूपाली बापट आणि ज्योती चौधरी यांचे शाळेच्या वतीने आभार मानण्यात आले.
हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. वैशाली गालापुरे, गोपाल चौधरी, संदीप घुगे, प्रदीप आसोदेकर, सुरेंद्र सोनार, संजय बेलदार, गणेश सूर्यवंशी, निरज शिंदे, प्रवीण पाटील आणि महेश पाठक यांनी विशेष परिश्रम घेतले.
