ऐनपूर येथील ३० वर्षीय युवकाचा शेतात मृतदेह आढळला; बीएनएस कलम १०३(१), ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल
रावेर | प्रतिनिधी
रावेर तालुक्यात अनैतिक संबंधाच्या संशयातून ३० वर्षीय तरुणाची हत्या झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणाचा छडा लावत रावेर पोलिसांनी अवघ्या २४ तासांत दोन संशयित आरोपींना अटक केली आहे.
मृताची ओळख शेख कुरबान शेख शब्बीर (वय ३०, रा. ऐनपूर, ता. रावेर) अशी झाली असून, त्यांचा मृतदेह नांदुरखेडा शिवारातील विनायक काशिनाथ पाटील यांच्या गट क्रमांक ९६ मधील शेतात आढळून आला.
याप्रकरणी मृताचा भाऊ शेख सलमान शेख शब्बीर (वय २७) यांनी रावेर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार बीएनएस कलम १०३(१) व ३(५) अंतर्गत गुन्हा क्रमांक ३४३/२०२६ नोंदविण्यात आला आहे.
तपासादरम्यान पोलिसांनी गणेश संजय घोरपडे आणि मेघराज वसंत सांगळे, दोघेही रा. भोर, ता. रावेर, यांना ताब्यात घेतले. दोन्ही संशयितांना १२ जुलै २०२६ रोजी रात्री १०.५२ वाजता अटक करण्यात आली.
प्राथमिक तपासात मृताच्या कुटुंबातील एका महिलेचे आरोपींपैकी एका व्यक्तीसोबत कथित अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून हा खून झाल्याचे समोर आले आहे. या संशयातून दोघांनी संगनमत करून शेतात नेऊन हत्या केल्याचा पोलिसांचा प्राथमिक संशय आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मनोज महाजन हे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत.
