चोपडा येथे राष्ट्रीय वर्षावास प्रवचन मालिकेचे दुसरे पुष्प संपन्न
‘भगवान बुद्ध आणि त्यांचा कर्मसिद्धांत’ विषयावर बौद्धाचार्य महेंद्र म्हैसरे यांचे मार्गदर्शन; बौद्ध उपासक-उपासिकांची उपस्थिती
चोपडा | प्रतिनिधी
भारतीय बौद्ध महासभा, जळगाव पूर्व अंतर्गत चोपडा तालुक्याच्या वतीने गौतम नगर समाज मंदिर येथे राष्ट्रीय वर्षावास प्रवचन मालिकेचे दुसरे पुष्प उत्साहात संपन्न झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय बौद्ध महासभेचे कोषाध्यक्ष आयु. जानकीराम शंकर सपकाळे होते.
कार्यक्रमाची सुरुवात तथागत भगवान गौतम बुद्ध आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली. त्यानंतर उपस्थितांनी त्रिशरण व पंचशील ग्रहण केले.
यावेळी ‘भगवान बुद्ध आणि त्यांचा कर्मसिद्धांत’ या विषयावर बौद्धाचार्य आयु. महेंद्र प्रल्हाद म्हैसरे यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी भगवान बुद्धांच्या कर्मसिद्धांताचे महत्त्व, नैतिक जीवनातील त्याचे स्थान आणि समाजकल्याणासाठी त्याची उपयुक्तता याविषयी सविस्तर विवेचन केले.
कार्यक्रमास शहराध्यक्ष भरत भिमराव शिरसाठ, समता सैनिक दल प्रमुख आयु. शालिग्राम व्यंकट करंदीकर, जानकीराम शंकर सपकाळे, संजय पिरा अहिरे तसेच भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी, बौद्ध उपासक-उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आयु. सुकदेव लक्ष्मण बाविस्कर यांनी केले, तर अनिल गोरख वाडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
