शेळावे मंडळात अतिवृष्टीग्रस्त शेतीचे पंचनामे सुरू; नुकसानग्रस्तांना तातडीने मदतीची मागणी
महसूल विभागाचे पथक शेतात दाखल; प्रत्यक्ष पाहणी करून नुकसानाची नोंद
पारोळा | प्रतिनिधी (सुरेश पाटोळे)
पारोळा तालुक्यातील शेळावे मंडळ परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे सुरू करण्यात आले आहेत. दहीगाव, मोहाडी, शेळावे, चिखलोद, राजवड, हिरापूर, धाबे आणि दगडी सबगव्हाण या गावांतील शेतकऱ्यांच्या शेतात महसूल विभागाचे अधिकारी प्रत्यक्ष भेट देऊन नुकसानीची नोंद करीत आहेत.
मोहाडी येथील ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) पराग पाटील यांनी नुकसानग्रस्त शेतांमध्ये जाऊन प्रत्यक्ष पाहणी करत पंचनामे केले. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून, प्रशासनाने वेळेत कार्यवाही सुरू केल्याबद्दल समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान
३१ जुलै रोजी झालेल्या अतिमुसळधार पावसामुळे शेळावे मंडळातील खेडीढोक, मोहाडी, दहीगाव, शेळावे आणि चिखलोद या गावांतील शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. त्यानंतर महसूल प्रशासनाने पंचनामा प्रक्रिया सुरू केली आहे.
उपविभागीय अधिकारी मनीष गायकवाड, तहसीलदार डॉ. उल्हास देवरे आणि मंडळ अधिकारी उदय निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली ग्राम महसूल अधिकाऱ्यांमार्फत पंचनामे करण्यात येत आहेत.
यावेळी कोतवाल देवेंद्रसिंग पाटील, सुनील पाटील, प्रदीप राजपूत, शेळावे खुर्दचे पोलीस पाटील महेंद्र सांगळे तसेच परिसरातील नुकसानग्रस्त शेतकरी उपस्थित होते.
अनुदानाची मागणी
पंचनाम्याची प्रक्रिया तातडीने पूर्ण करून शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरात लवकर आर्थिक मदत व पीक नुकसानीचे अनुदान जाहीर करावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.
