नाथ संप्रदायाच्या ‘आदेश’ दिवाळी अंकाचे दिमाखात प्रकाशन!
मराठी आणि हिंदी भाषेतील अंकाचे मान्यवरांच्या हस्ते अनावरण; नाथ संप्रदायाचे साहित्य भक्तांसाठी अनमोल मार्गदर्शक असल्याचे गौरवोद्गार
नाशिक | प्रतिनिधी
नाथ संप्रदायाच्या वतीने दरवर्षी प्रकाशित करण्यात येणाऱ्या ‘आदेश’ दिवाळी अंकाचे मराठी आणि हिंदी भाषेतील प्रकाशन रविवार, १ नोव्हेंबर रोजी नाशिक येथील पंचवटी परिसरात उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. श्री काळाराम मंदिरामागील शनी चौकाजवळील स्वाद हॉल, भाविदिशा अपार्टमेंट येथे मान्यवरांच्या हस्ते या अंकाचे प्रकाशन करण्यात आले.
या कार्यक्रमाला अंकाचे संपादक गणेशनाथ जयराम मोरे (टीटवाळा), प्रमुख अतिथी डॉ. गजानन विठोबा बाजड-पाटील (माऊली), विशेष अतिथी श्री काळाराम मंदिर संस्थानचे पुजारी नरेश जयराम पुजारी आणि सचिन गजानन पुजारी, माजी जिल्हाधिकारी रघुनाथ राठोड तसेच साहित्य परिषद अध्यक्ष व ज्येष्ठ लेखक नवनाथ गायकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
नाथ संप्रदायाच्या साहित्याचे महत्त्व अधोरेखित
यावेळी डॉ. गजानन पाटील आणि माजी जिल्हाधिकारी रघुनाथ राठोड यांनी नाथ संप्रदायाची परंपरा, विचारधारा आणि साहित्याचे महत्त्व विशद केले. ‘आदेश’ दिवाळी अंकातील साहित्य नाथ भक्तांसाठी अनमोल असून ते संप्रदायाच्या विचारांचा प्रसार करण्याबरोबरच भक्तांना मार्गदर्शन करणारे आहे, असे गौरवोद्गार त्यांनी काढले.
कार्यकारी मंडळासह नाथ बंधू-भगिनींची उपस्थिती
कार्यक्रमाला कार्यकारी मंडळातील भगवाननाथ मोरे, राजू घुले, अनिल भुसारी, नरेशनाथ मोरे, निलेशनाथ मोरे, भरतकुमार जोगी, मधुकरनाथ चव्हाण, विशालनाथ जोगी, शरदनाथ पंजे, सुनील पंजे, माणिकनाथ कानडे, माणिकनाथ पवार, सुरेशनाथ मोरे, प्रकाश बर्वे यांच्यासह नाथ संप्रदायातील बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजयनाथ परमसागर यांनी केले, तर भगवाननाथ मोरे यांनी उपस्थितांचे आभार मानले. मराठी आणि हिंदी अशा दोन्ही भाषांमधून ‘आदेश’ दिवाळी अंक प्रकाशित झाल्याने नाथ संप्रदायाचे विचार आणि साहित्य अधिक व्यापक वाचकवर्गापर्यंत पोहोचण्यास मदत होणार आहे.
