देगलूरमध्ये लोकशाहीच्या रक्षणासाठी एल्गार; जनआंदोलनाचा १७ वा दिवस उत्साहात!
‘लोकशाही वाचवा, संविधान वाचवा’च्या घोषणांनी परिसर दणाणला; विविध क्षेत्रांतील मान्यवरांची आंदोलनस्थळी उपस्थिती
देगलूर | प्रतिनिधी
लोकशाही आणि संविधानाच्या संरक्षणासाठी देगलूर येथे सुरू असलेल्या भव्य जनआंदोलनाचा १७ वा दिवस उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या शेजारील ‘प्रति जंतर-मंतर’ मैदानावर हे आंदोलन सुरू असून, लोकशाहीच्या रक्षणासाठी नागरिकांनी एकजुटीने पुढे येण्याचा निर्धार यावेळी व्यक्त केला.
आंदोलनस्थळी ‘लोकशाही वाचवा, संविधान वाचवा’, ‘ज्ञानेश कुमार राजीनामा दो’, ‘इन्कलाब जिंदाबाद’, ‘जय भीम, जय भारत’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. आंदोलनाला विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि युवा कार्यकर्त्यांनी उपस्थिती लावून पाठिंबा दर्शविला.
यावेळी युवा नेते बंटी उर्फ शशिकांत कांबळे, इरफान भाई, आदित्य मसुरे, योगेश उप्पलवार, युवा नेते मंगलदीप सिताफुले तसेच बॉबी उर्फ प्रबुद्ध वाघमारे जाहुरकर उपस्थित होते.
घटनात्मक मूल्यांच्या जपणुकीचा संदेश
प्राचार्य, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक आणि राज्यघटना अभ्यासक संघशिल भद्रे उर्फ एस. एन. नांदेडकर सर यांनी आंदोलनस्थळी सदिच्छा भेट देत उपस्थितांशी संवाद साधला. लोकशाही व्यवस्था अधिक बळकट करणे, संविधानाचे संरक्षण करणे आणि नागरिकांमध्ये घटनात्मक मूल्यांविषयी जागरूकता निर्माण करणे यासाठी अशा जनआंदोलनांची भूमिका महत्त्वपूर्ण असल्याचे यावेळी अधोरेखित झाले.
लोकशाही आणि संविधानाच्या रक्षणासाठी सुरू असलेल्या या आंदोलनाला १७ दिवस पूर्ण झाल्याने आंदोलनकर्त्यांचा उत्साह कायम असल्याचे चित्र दिसून आले. विविध मान्यवरांच्या उपस्थितीमुळे आंदोलनाला अधिक बळ मिळत असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले.
