दैनिक जनसम्राट टाइम्सचे ठाणे जिल्हा प्रतिनिधी सुरेश जगताप यांना ‘भारत विश्वरत्न पुरस्कार’!
पत्रकारितेतील सत्यनिष्ठ आणि निर्भीड लेखणीचा गौरव; ‘लेखणी सम्राट’ किताबानेही सन्मानित
कल्याण | सुरेश जगताप
सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, आर्थिक आणि पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्वांचा गौरव करण्यासाठी इंडियन कॉपीराइट प्रोटेक्शन अँटी पायरसी सेल, मुंबई यांच्या वतीने आयोजित ‘भारत विश्वरत्न पुरस्कार २०२६’ सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. या सोहळ्यात दैनिक जनसम्राट टाइम्सचे ठाणे जिल्हा प्रतिनिधी सुरेश भजन जगताप यांना त्यांच्या निःस्वार्थ समाजसेवेची आणि पत्रकारितेतील सत्यनिष्ठ, निर्भीड लेखणीची दखल घेत ‘भारत विश्वरत्न पुरस्कार’ प्रदान करून गौरविण्यात आले. यावेळी त्यांना ‘लेखणी सम्राट’ या किताबानेही सन्मानित करण्यात आले.
संस्थेचे अध्यक्ष तथा मुख्य तपासी अधिकारी रामजीत (जितू) महादेव गुप्ता यांनी राज्यातील विविध भागांतील गुणवंत व्यक्तींची निवड केली होती. या निवड प्रक्रियेत सर्वानुमते दैनिक जनसम्राट टाइम्सचे सुरेश जगताप यांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.
कल्याणमध्ये दिमाखदार पुरस्कार सोहळा
रविवार, १ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ९ वाजता कल्याण पश्चिम येथील के. एम. अग्रवाल कॉलेजच्या वातानुकूलित सभागृहात, पडघा रोड, खडकपाडा येथे हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला.
कार्यक्रमाची सुरुवात भक्तिगीताने झाली. त्यानंतर देव-अवतार आणि महापुरुषांचे हुबेहूब सादरीकरण तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांची मने जिंकली. राज्यभरातून आलेल्या मान्यवरांच्या उपस्थितीत सोहळ्याला विशेष रंगत आली.
मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरण
यावेळी इंडियन आर्मीचे सुभेदार महेंद्र गवई, भारुड सम्राट गोविंद महाराज गायकवाड, विकास खर्चे, अभिनेत्री नेहा जोशी, अनिता गुजर आणि डॉ. जितेंद्र जोशी आदी मान्यवरांच्या हस्ते सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, आर्थिक, पत्रकारिता तसेच विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
दैनिक जनसम्राट टाइम्सचे प्रतिनिधी सुरेश जगताप यांना ‘भारत विश्वरत्न पुरस्कार’ आणि ‘लेखणी सम्राट’ किताब मिळाल्याने कल्याण-डोंबिवलीसह ठाणे जिल्ह्यातील पत्रकार बांधव, सामाजिक कार्यकर्ते आणि हितचिंतकांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
