भरदुपारी दोन रानडुकरांचा महिला मजुरांवर हल्ला; बालिकेसह तिघी जखमी
कांदा लागवडीदरम्यान भरदुपारी घडली घटना; वन्यप्राण्यांच्या वाढत्या वावरामुळे शेतकरी-मजुरांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
असोदा, ता. जळगाव | प्रतिनिधी
असोदा शिवारातील शेतात कांदा लागवडीचे काम सुरू असताना दोन रानडुकरांनी महिला मजुरांवर अचानक हल्ला केल्याची धक्कादायक घटना सोमवारी घडली. या हल्ल्यात पाच वर्षीय बालिकेसह तीन महिला जखमी झाल्या आहेत. जखमींना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर त्यांना घरी सोडण्यात आल्याची माहिती आहे. या घटनेमुळे असोदा परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
अचानक हल्ल्यामुळे शेतात उडाली धावपळ
मिळालेल्या माहितीनुसार, असोदा येथील शेतकरी श्री. शांताराम चिंधु महाजन यांच्या शेतात नशिराबाद येथील महिला मजूर कांदा लागवडीचे काम करीत होत्या. सकाळी सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास दोन रानडुकरांनी अचानक शेतात प्रवेश केला आणि महिलांवर हल्ला चढविला. या हल्ल्यात एका महिलेसह पाच वर्षीय बालिकेला रानडुकरांनी चावा घेतला, तर आणखी एका महिलेला धक्काबुक्कीमुळे मुका मार लागला. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे शेतात काम करणाऱ्या महिलांमध्ये घबराट पसरली.
बालिकेसह तिघींवर उपचार
या घटनेत भव्या सुनील नारखेडे (वय ५ वर्षे), तमीज अन्वर पिंजारी (वय ५५ वर्षे) आणि माधुरी येवले (वय ३० वर्षे) या तिघी जखमी झाल्या. त्यांना तत्काळ शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचारानंतर त्यांना घरी सोडण्यात आल्याची माहिती मिळाली.
रानडुकरांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
या घटनेनंतर शेतकरी शांताराम चिंधु महाजन यांनी शेतशिवारात वाढत असलेल्या रानटी जनावरांच्या वावरामुळे शेतकरी आणि शेतमजुरांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाल्याचे सांगितले. वन विभाग आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे रानडुकरांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.
गेल्या काही काळात वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांच्या घटनांमुळे ग्रामीण भागात चिंता व्यक्त होत आहे. शेतात काम करणाऱ्या मजुरांच्या सुरक्षिततेसाठी वन विभाग आणि प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.
